
नांदेड, 6 नोव्हेंबर (हिं.स.) - जिल्हयातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा, नगरपरिषदांसह, हिमायतनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे या नगरपरिषद/नगरपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होईल यांची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बैठक संपन्न झाली. यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व नगरपरिषद नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नगरपरिषद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र् राज्य यांचे आदेशान्वये नांदेड जिल्ह्यातील या नगरपरिषद नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील 12 नगरपरिषद एका नगरपंचायतीच्या् संपूर्ण क्षेत्रात तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता काळात सबंधित नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रात असलेले सर्व बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे काढून टाकण्याचे, भींतीवरील राजकीय मजकुर पुसून टाकण्याचे व राजकीय पक्षाचे बोर्ड काढून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मुख्याधिकारी यांना दिले. तसेच मतदार यादीतील दुबार-तिबार मतदाराबाबत आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कटाक्षाने कार्यवाही करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
कायदा व सुव्यवस्था पोलीस अधीक्षक व सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी यांना नगरपरिषद/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत संबंधित शहरासह संपूर्ण जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. कोठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी सूचित केले. कायदा व सुव्यवस्थेबाबत आदर्श आचासंहितेचे उल्लंघन होणार नाही आणि आदर्श आचारसंहितेची प्रभावी अमंलबजावणी होईल याचीही दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी या कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या नगरपरिषद / नगरंपचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या अनुषंगाने आयोगाचे वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक विषयक कामकाज विहित वेळेत पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व संबंधिताना दिल्या. ही निवडणूक लोकशाहीचे मूल्य जोपासून निष्पक्ष, निर्भय व शांत वातावरणात पार पडेल, याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis