अमरावती विभागात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी 2,034 कोटींचा मदत निधी मंजूर
अमरावती विभागात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी 2,034 कोटीचा मदत निधी मंजूर - विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल शेतकऱ्यांनी ई केवायसी, फार्मर आयडी नोंदणी करण्याचे आवाहन अमरावती, 6 नोव्हेंबर (हिं.स.)। जून ते सप्टेंबर 2025 या कालाव
अमरावती विभागात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी 2,034 कोटीचा मदत निधी मंजूर


अमरावती विभागात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी 2,034 कोटीचा मदत निधी मंजूर - विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

शेतकऱ्यांनी ई केवायसी, फार्मर आयडी नोंदणी करण्याचे आवाहन

अमरावती, 6 नोव्हेंबर (हिं.स.)।

जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यांत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून रब्बी हंगामाकरीता बियाणे व अनुषंगीक बाबींकरीता विशेष मदत पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे (3 हेक्टरच्या मर्यादेत) अमरावती विभागाला 2 हजार 34 कोटीचा अतिरिक्त मदत निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. यासंदर्भात महसूल व वन विभागाने 4 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित केला, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी दिली.

विभागातील शेतकरी बंधुंनी या मदत प्राप्तीसाठी स्वत:च्या बँक खात्याची ई-केवायसी तसेच फार्मर आयडी काढून घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवून शेतकऱ्यांच्या शेती व शेतीपिकांचे नुकसान तसेच मनुष्य व पशुहानी, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार बाधित शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे खरेदी व अनुषंगीक बाबींसाठी विशेष मदत देण्यासाठी राज्य शासनाने अमरावती विभागाला मदत निधी मंजूर केला आहे. त्यानुसार अमरावती विभागातील 20 लाख 86 हजार 445 शेतकऱ्यांना एकूण 2,034 कोटी 43 लाख 46 हजार रुपये इतका मदतनिधी वितरीत केला जाणार आहे. यासंबंधी अचूक कार्यवाही होण्यासाठी संबंधित महसूल यंत्रणेला यापूर्वीच शासन निर्णयाव्दारे सूचना देण्यात आल्या आहेत.

सदर मदत निधी हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी पोर्टलव्दारे वितरीत केला जाणार आहे. यासाठी कार्यान्वयन यंत्रणांनी सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमून्यात काळजीपूर्वक तयार करुन ती संबंधित अधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीवर भरुन मान्यतेबाबतची कार्यवाही पूर्ण करावी. मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याचे खात्री करावी. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदत निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळता करु नये, अशा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मदतनिधीचा तपशील पुढीलप्रमाणे :

अमरावती विभाग (बियाणे व इतर अनुषंगिक बाबी/कालावधी जून-सप्टेंबर 2025)

*अमरावती जिल्हा :* बाधित शेतकरी संख्या -2,24,915 I बाधित क्षेत्र (हेक्टर)- 1,86,902.5 I निधी (रु.लक्ष)- 18690.25

*अकोला जिल्हा :* बाधित शेतकरी संख्या-3,56,229 I बाधित क्षेत्र (हेक्टर)- 3,23,496.88 I निधी (रु.लक्ष)- 32349.68

*यवतमाळ जिल्हा :* बाधित शेतकरी संख्या-5,23,345 I बाधित क्षेत्र (हेक्टर)- 6,38,158.10 I निधी (रु.लक्ष)- 63815.82

*बुलढाणा जिल्हा :* बाधित शेतकरी संख्या-6,85,338 I बाधित क्षेत्र (हेक्टर)- 6,10,572.80 I निधी (रु.लक्ष)- 61057.28

*वाशिम जिल्हा :* बाधित शेतकरी संख्या-2,96,618 I बाधित क्षेत्र (हेक्टर)- 2,75,304.32 I निधी (रु.लक्ष)- 27530.43

*एकूण :* बाधित शेतकरी संख्या-20,86,445 एकूण बाधित क्षेत्र (हेक्टर)- 20,34,434.60 एकूण निधी (रु.लक्ष)-- 203443.46

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande