
अमरावती, 6 नोव्हेंबर (हिं.स.)
वरूड तालुक्यात कापूस व सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. निसर्गाच्या रौद्ररुपासोबतच शासनाच्या उदासीन धोरणांमुळे शेतकरी हताश झाले आहेत. सध्या चांगल्या प्रतीच्या कापसाला ६,५०० ते ६,६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असला, तरी खरेदी केंद्रांअभावी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे ट्रॅक्टरने माल घेऊन जावे लागत आहे.
सोयाबीनबाबतही परिस्थिती गंभीर आहे. व्यापारी मनमानी दर सांगत असून, चांगल्या प्रतीच्या सोयाबीनलाही प्रतिक्विंटल फक्त ४ हजार रुपये भाव येतो. त्यातही १५ ते २० टक्के ओलावा (मॉइश्चर) वजा करून अंतिम भाव ३,००० ते ३,२५० रुपयांवर येतो. शिवाय ४० किलोच्या पोत्यात ४ ते ५ किलो वजन कमी दाखवण्याचाही प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.शासकीय खरेदी केंद्रे मंजूर असूनही एकाही ठिकाणी कार्यरत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे, तर खासगी व्यापाऱ्यांचा मात्र चांगलाच फायदा होत आहे. परिणामी, लागवड खर्चही वसूल न होणाऱ्या परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी