औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर फलक बदला; संभाजी ब्रिगेडचा इशारा
धुळे, 7 नोव्हेंबर, (हिं.स.) राज्यभर औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे झाल्यानंतरही धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावर अजूनही औरंगाबाद असेच नाव कायम असल्याने संभाजी ब्रिगेडकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत दि.७
औरंगाबादऐवजी छत्रपती संभाजीनगर फलक बदला; संभाजी ब्रिगेडचा इशारा


धुळे, 7 नोव्हेंबर, (हिं.स.) राज्यभर औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे झाल्यानंतरही धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावर अजूनही औरंगाबाद असेच नाव कायम असल्याने संभाजी ब्रिगेडकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत दि.७ नोव्हेंबर रोजी धुळे जिल्हाधिकारी प्रशासनास निवेदन देण्यात आले. दोन दिवसांच्या आत संबंधित फलकावर योग्य नामफलक बसविण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने महाराष्ट्राचा इतिहास उज्ज्वल बनला. हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणार्पण केले. मात्र ज्या औरंगजेबाने महाराजांची निर्घृण हत्या केली, त्याच्याच नावावर औरंगाबादचे नामकरण झाले असल्यामुळे संभाजी ब्रिगेडसह सर्व शंभूप्रेमी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवून छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्याची मागणी केली होती. शासनाने ती मागणी मान्य करून अधिकृत नामांतर केले. तरीसुद्धा धुळे जिल्ह्यातील धुळे शहरालगत नगाव बारी येथील साई किसन हॉटेलसमोरील राष्ट्रीय महामार्गावरील फलकावर अजूनही औरंगाबाद हेच नाव दर्शविले जात असल्याने संभाजी ब्रिगेड, धुळे जिल्हा शाखेने तीव्र नाराजी व्ये केली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागास वारंवार लेखी सूचना देण्यात आल्या असून, तरीही कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसांच्या आत या फलकाची दुरुस्ती करून छत्रपती संभाजीनगर हे नाव नोंदवावे. अन्यथा सर्व शंभूप्रेमी संघटना आक्रमक आंदोलन करतील आणि यामुळे उद्भवणार्‍या सर्व परिस्थितीची जबाबदारी प्रशासनावर राहील. असा इशारा निवेदन सादर करीत देण्यात आला. निवेदन देताना धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे धुळे जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande