
रत्नागिरी, 7 नोव्हेंबर, (हिं. स.) : प्रतिवर्षाप्रमाणे येथील जी. जी. पी. एस. प्रशालेच्या कै. बाबूराव जोशी गुरुकुल प्रकल्पातर्फे मातृभूमी परिचय शिबिर आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी त्याचा आनंद लुटला.
विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून काही दिवस लांब राहण्याची, स्वावलंबी जीवनाची,आपल्या समवयस्कांसोबत मिळूनमिसळून राहण्याची सवय लागावी या उद्देशाने दरवर्षी या शिबिराचे आयोजन करण्यात येते. शिबिरादरम्यान विविध विषयांवरील मार्गदर्शनपर सत्रे आयोजित केली जातात. मुलांमध्ये सामाजिक भावना वाढीस लागावी, यासाठी गावभेटी आयोजित केल्या जातात. याखेरीज उपासना, सूर्यनमस्कार या नित्यनेमाच्या गोष्टींसोबतच विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, क्षेत्रभेटी यांचेही आयोजन केले जाते. आपल्या मातृभूमीचा, संस्कृतीचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे व त्याविषयी आत्मीयता निर्माण करणे हा या शिबिराचा प्रमुख हेतू आहे.
यावर्षीचे पाचवीचे शिबिर पावसजवळील आंबेरे या गावी, सहावी-सातवीचे एकत्रित शिबिर देवरूख येथे, तर आठवीचे शिबिर मालवणमधील आचरा या गावी आयोजित करण्यात आले होते. नववीचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून गटागटाने तिन्ही शिबिरात सहभागी झाले होते.
गुरुकुलचे सर्व शिक्षकही तिन्ही ठिकाणच्या शिबिरांमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते. सर्व शिबिरे गुरुकुल विभाग प्रमुख वासुदेव परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जी.जी.पी.एस. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर व रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने पार पडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी