
पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। धनकवडी आणि आंबेगाव खुर्द परिसरात झालेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने हातोडा मारला असून, परिसरातील तब्बल १३ हजार ५०० फूट अनधिकृत बांधकाम भुईसपाट करण्यात आले. १ जेसीबी, १ गॅस कटर आणि ७ अतिक्रमण कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग (झोन क्र. ०२) कडून ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिस कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (MSF) सहकार्य लाभले.
नवीन हद्दीतील धनकवडी सर्वे नं. २२, सर्वे नं. ३ आणि आंबेगाव खुर्द सर्वे नं. ४१, साई मंदिर परिसरामागील दोन गल्ल्यांमध्ये आर.सी.सी., पक्क्या स्वरूपातील अनधिकृत बांधकाम उभारले असल्याची माहिती मिळाल्यानंतर या बांधकामांवर कारवाई करण्यात आली.कारवाईदरम्यान १३,५०० चौरस फूट अनधिकृत बांधकाम क्षेत्र निष्कासित करण्यात आले, अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली. ही कारवाई महापालिकेचे बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर आणि झोन क्र. ०२ चे कार्यकारी अभियंता नवाळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु