
नाशिक, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। महिलांच्या आरोग्य आणि कॅन्सर जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, अशोका कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका (सीसीए), नाशिक यांनी एक व्यापक मोफत कॅन्सर तपासणी मोहिम राबवली. स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सरच्या लवकर निदान व प्रतिबंधात्मक काळजीसाठी ही मोठ्या प्रमाणावरची मोहिम राबवण्यात आली, जे महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारे आणि जीवघेणे कॅन्सर आहेत.
या मोहिमेद्वारे २,४५२ महिलांपर्यंत पोहोचण्यात आले, ज्या विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील होत्या. आरोग्यसेवांमध्ये अडथळे असलेल्या महिलांना मोफत तपासणी आणि आरोग्य शिक्षण देऊन त्यांना सशक्त बनवण्यात आले. तपासणी पॅकेजमध्ये मॅमोग्रॅम – स्तन कॅन्सरचे लवकर निदान, पॅप स्मीयर – गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी, पूर्ण रक्त तपासणी (CBC) – एकूण आरोग्य स्थिती आणि असामान्यता ओळखण्यासाठी आदींचा समावेश होता.
ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिन्याच्या अनुषंगाने,सीसीए ने ११ आरोग्यविषयक माहिती सत्रांचे आयोजन केले, ज्यात १,०८० महिलांनी सहभाग घेतला. हे सत्र डॉ. श्रद्धा वालवेकर, वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रतिबंधात्मक कॅन्सर तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या उपक्रमाला सीसीए नाशिकच्या सर्व सल्लागार डॉक्टरांचा सक्रिय पाठिंबा लाभला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV