
चंद्रपूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)।जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सकाळ व सायंकाळच्या सत्रात अंदाजे दोन ते अडीच हजार खेळाडू - नागरीक-क्रीडाप्रेमी नियमित 400 मी. सिंथेटिक ट्रॅकचा वापर करतात. क्रीडा संकुलामध्ये द्वितीय टप्प्यात बांधण्यात आलेल्या प्रसाधानगृहाची क्षमता आज रोजी कमी आहे. त्यामुळे प्रसाधनगृह वापरावर अधिक ताण येत आहे. पर्यायाने साफसफाईवर सुध्दा ताण येत आहे. या बाबीकडे लक्ष देवून नियमित साफसफाई करण्यात येत असून क्रीडा संकुलाच्या येणाऱ्या आगामी बैठकीत प्रसाधनगृहाच्या क्षमतेमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येईल, तसेच खेळाडूंची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर काळजी संकुल समितीतर्फे घेण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी दिले आहे.
संकुलामध्ये पिण्याच्या पाण्याकरिता 2 वॉटर कुलर स्थापीत करण्यात आले आहेत. त्याची नियमित साफसफाई करण्यात येत असते. क्रीडा संकुलामध्ये सकाळ व सायंकाळच्या सत्रात येणारे खेळाडू व नागरीकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यानुसार क्रीडा सोईसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. खेळाडूंनी क्रीडा संकुलातील सुविधांचा योग्य वापर करावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव