चंद्रपूर - ३ हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत निनादला ‘वंदे मातरम’ चा सूर
चंद्रपूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा आणि उर्जा देणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखीत ''वंदे मातरम'' या गिताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अं
चंद्रपूर - ३ हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत निनादला ‘वंदे मातरम’ चा सूर


चंद्रपूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा आणि उर्जा देणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखीत 'वंदे मातरम' या गिताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अंतर्गत येणारे चंद्रपूर येथील ऋषी अगस्त्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि राणी दुर्गावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक गायन कार्यक्रमात ३ हजार शालेय विद्यार्थ्यांनी 'वंदे मातरम' चा सूर लावून भारत भुमिचा गौरव केला.

जिल्हा क्रीडा संकूल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, प्रमुख वक्त्या प्राचार्य अश्विनी बुजोने, ऋषी अगस्त्य औद्यो. प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गजानन राजूरकर, राणी दुर्गावती औद्यो. प्रशि. संस्थेच्या प्राचार्य कल्पना खोब्रागडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, सहायक आयुक्त (कौशल्य विकास) अनिसा तडवी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे, मनिष महाराज आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, ‘वंदे मातरम’ या गिताच्या रचनेला आज १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने या सामूहिक गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वंदे मातरम’ या गितामुळे भारतीय स्वातंत्रलढ्याचा आवाज बुलंद झाला आणि स्वातंत्र्यलढ्याला एक नवी दिशा मिळाली. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांना अभिवादन करून सर्वांनी स्वातंत्र्याच्या मुल्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे. आपले गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देश समृध्द करण्यासाठी आपण सर्व मिळून काम करू या, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणाले, १८७५ मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘वंदे मातरम’ या गिताची रचना केली. या गितामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक नवीन प्रेरणा मिळाली. ती प्रेरणा घेऊन आत्मनिर्भरता, एकात्मता आणि अखंडता जोपासण्यासाठी सर्व जण एकत्रित प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

तत्पुर्वी प्राचार्य योगिनी देगमवार यांच्या मार्गदर्शनात उपस्थितांनी एकत्रित ‘वंदे मातरम’ या गिताचे सामूहिक गायन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्त्या प्राचार्य अश्विनी बुजोने यांनी ‘वंदे मातरम’ या गिताचा इतिहास व महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन पियुष केने यांनी तर आभार बंडोपंत बोढेकर यांनी मानले. कार्यक्रमाला रोशन पाटील, नामदेव राऊत, प्रज्वल गर्गेलवार यांच्यासह मोठ्या संख्येने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तसेच विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande