
पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। आमचा कुठल्याही गुन्हेगाराशी संबंध नाही. भाजप कधीही गुन्हेगारांना पाठबळ देत नाही,” असे स्पष्ट शब्दांत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत पाटील यांनी विविध आरोप, पोलिस यंत्रणा, तसेच कोथरूडमधील सुरक्षेच्या मुद्द्यांवर भाष्य केले. “मला दररोज हजारो लोक भेटतात; त्यांच्यापैकी काहींसोबत अनवधानाने फोटो घेतले जातात. त्यामुळे कोणाशी संबंध जोडणे योग्य नाही,” असे ते म्हणाले.
पाटील यांनी पोलिसांना सूचित केले की, “कोण, कुठून पैसा कमावतो हे तपासा. संपत्ती वाढल्यास ईडीकडे तक्रार करा. येत्या आठवड्यात पोलिस गुन्हेगारांची नावे देऊन ईडीकडे लेखी तक्रार करतील.” ते पुढे म्हणाले, “रेकॉर्डवरील गुन्हेगारांना वारंवार पोलीस ठाण्यात बोलवा. अटक होत नसेल तर दिवसभर ठेवा; मानसिक दबाव निर्माण करा. पोलिसांनी सोशल मीडियावर सक्रिय राहावे आणि माध्यमांशी सातत्याने संवाद साधावा.” कोथरूड मतदारसंघातील परिस्थितीबाबत बोलताना पाटील म्हणाले, “हा हिंदू बहुल परिसर आहे. येथील धार्मिक समतोल राखण्यासाठी पोलिसांनी जागरूक राहावे. दर्ग्यांचे ट्रस्टी कोण, बाहेरून नमाजाला येणारे कोण हेही तपासा. आमचा उपासनेला विरोध नाही, पण उपासना कुठे आणि कशी करायची याचे भान असावे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु