

मुंबई, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। देशभक्ती जागृत करणा-या 'वंदे मातरम्' गीताचा प्रत्येकाने गौरव करायला हवा. 'वंदे मातरम्' कडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघणा-यांकडे दुर्लक्ष करत या गीताचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी केले. राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या 'वंदे मातरम्' गीताच्या 150 व्या वर्ष पूर्तीनिमत्त प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे प्रदेश कार्यालयात 'वंदे मातरम्' च्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रम संपन्न झाला. त्या वेळी श्री. चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमात संपूर्ण 'वंदे मातरम्' चे समूह गायन झाले. तसेच स्वदेशी वस्तू वापराचा संकल्प सोडण्यात आला. या कार्यक्रमाला आ. राजेश वानखेडे, आ. प्रवीण पोटे पाटील, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माधवी नाईक, ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर, माजी आ. सुरेश हळवणकर, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, कार्यालय सह प्रभारी सुमंत घैसास, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, ओमप्रकाश चौहान, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते गणेश खणकर यांनी 'वंदे मातरम्' गीताचा स्फूर्तीदायक इतिहास कथन केला.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर 'वंदे मातरम्' गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सार्ध शताब्दी महोत्सव साजरा होत आहे. 'वंदे मातरम्' या गीताने स्वातंत्र्यलढ्यात देशभक्ती आणि एकतेची भावना जागृत केली. देशप्रेमाचे प्रतीक असलेले 'वंदे मातरम्' हे गीत 150 वर्षांपासून लोकांच्या मनात देशाबद्दल जाज्वल्य अभिमान आणि भारतीयांना स्फूर्ती देत आहे. या गीताचा सन्मान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नव्या पिढीपर्यंत हे गीत सन्मानाने पोहोचले पाहिजे. प्रत्येकाने 'वंदे मातरम्' हे गीत अभिमानाने म्हणायला हवे आणि जे हे गीत म्हणणार नाहीत त्यांना गीताचा इतिहास आणि महत्व पटवून द्यावे असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर