
सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। फेसबुकवर ‘स्पष्टवक्ता’ या नावाने चालविल्या जाणाऱ्या अकाउंटवरून पद्मशाली समाजाविषयी अपमानास्पद आणि भडकाऊ वक्तव्ये करण्यात आल्याने समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघ आणि पद्मशाली युवक संघटना, सोलापूर यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत सोलापूर शहराचे पोलिस आयुक्त मा. एम. राजकुमार यांना निवेदन सादर केले.
या प्रसंगी अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास (भाऊ) संगा यांनी सांगितले “‘स्पष्टवक्ता’ या अकाउंटवरून पद्मशाली समाजाबद्दल हेतुपुरस्सर बदनामी केली जात आहे. या पोस्ट आणि कमेंट्समुळे समाजातील ऐक्य आणि शांततेला बाधा येत आहे. प्रशासनाने या समाजकंटकांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी.”त्याचप्रमाणे पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष श्री. शेखर कटकम यांनीही संताप व्यक्त करत सांगितले “सोशल मीडियाचा गैरवापर करून समाजात विषारी वातावरण निर्माण करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने नमुना ठरणारी कारवाई करावी. आम्ही सर्व पद्मशाली बांधवांनी शांततेचा आणि ऐक्याचा संदेश देण्याचा निर्धार केला आहे.”संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की “जर या प्रकरणात तातडीने आणि ठोस कारवाई झाली नाही, तर पद्मशाली युवक संघटना आणि तेलुगू भाषिक समाजाच्या वतीने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येईल.”निवेदन सादर करताना संघटनेचे प्रेसिडेंट नागेश बोमड्याल, उपाध्यक्ष प्रविण जिल्ला, प्रसिद्धी प्रमुख पवन गुंडेटी, ॲड. शाम आडम, माजी अध्यक्ष साईराम बिर्रू, अमर बोडा, संतोष चन्ना पंतुलु यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड