गिरीश महाजनांनी बीएचआरसह इतर माध्यमातून भूखंड लाटले - उन्मेष पाटील
जळगाव , 7 नोव्हेंबर (हिं.स.)महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पार्थ पवार यांचं जमीन खरेदी प्रकरण गाजत असून कोरेगाव पार्क येथील बाजारभाव १८०० कोटींची असलेली जमीन फक्त ३०० कोटींना खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांवर
गिरीश महाजनांनी बीएचआरसह इतर माध्यमातून भूखंड लाटले - उन्मेष पाटील


जळगाव , 7 नोव्हेंबर (हिं.स.)महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पार्थ पवार यांचं जमीन खरेदी प्रकरण गाजत असून कोरेगाव पार्क येथील बाजारभाव १८०० कोटींची असलेली जमीन फक्त ३०० कोटींना खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून अशातच शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यावर भूखंडाचा मोठा आरोप केला आहे. सोबतच आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही गौण खनिज चोरीचा आरोप केला. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गिरीश महाजनांवर आरोप करताना उन्मेष पाटील म्हणाले की, भूखंडाच्या बाबतीत पार्थ पवारांनी केलेला तर प्रकार हा फक्त नमुना आहे. सॅम्पल आहे. यामागचं खरं विद्यापीठ म्हणजे भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था (बीएचआर) आणि इतर माध्यमातून भूखंड लूट करणारा नेता म्हणजे गिरीश महाजन आहे, असा गंभीर आरोप उन्मेष पाटलांनी केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.त्याचप्रमाणे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही उन्मेष पाटील यांनी गौण खनिज चोरीचा आरोप केला. चाळीसगावातील एमआयडीसी परिसरात शेकडो कोटींच्या गौण खनिज चोरीचा आरोपही त्यांनी मंगेश चव्हाण यांच्या गटावर केला. “अकरावी-बारावी नापास असलेला माणूस हजारो कोटींचा मालक कसा झाला? हा पैसा मेहनतीने कमावला की जनतेला लुटून?”, असा थेट सवाल त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना उद्देशून केला. “मी कामांमधून टक्केवारी घेत नाही, पण मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगावची लूट चालू आहे. या सर्वांचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही लूट यात्रा काढणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले. “मंगेश चव्हाण हा पाठीत खंजीर खुपसणारा नेता आहे. मी आणि पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार हे त्याचे पहिली दोन उदाहरणे आहेत. आता पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रकरणात त्यांचा खरा चेहरा पुन्हा समोर आला आहे,” असे त्यांनी म्हटले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande