गडचिरोली - जिल्ह्यात निनादले ‘वंदे मातरम्’चे सूर
गडचिरोली, 7 नोव्हेंबर, (हिं.स.) स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, अशा सर्व मा
सामूहिक वंदे मातरम गायन


गडचिरोली, 7 नोव्हेंबर, (हिं.स.) स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, अशा सर्व माध्यमांच्या १९७२ शाळा, महाविद्यालये, शासकीय तंत्रनिकेतन तसेच जिल्हा परिषद, गोंडवाना विद्यापीठ आणि सर्व तहसील मध्ये “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. याबरोबरच काव्यवाचन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व वंदे मातरम गीता संबंधित प्रदर्शन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले

या विशेष उपक्रमात शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत देशप्रेमाचे सामूहिक दर्शन घडविले. संपूर्ण जिल्ह्यात “वंदे मातरम्”चे सूर निनादले आणि देशभक्तीची लहर निर्माण झाली.

वंदे मातरम् हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी रचले होते. स्वातंत्र्यलढ्यादरम्यान या गीताने भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली. आज १५० वर्षांनंतरही या गीतातील ओज, प्रेरणा आणि राष्ट्रीय अभिमान तितकाच जिवंत आहे. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य संग्रामातील या गीताचे ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगण्यात आले.

शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम पार पडला. शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला वंदन करून सामूहिक “वंदे मातरम्”चे सादरीकरण केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली यांनी केले होते.

जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, कौशल्य विकास विभाग आणि शाळा व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सर्वत्र साजरा करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande