
पुणे, 7 नोव्हेंबर, (हिं.स.) खेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे सुमारे ४२४.०७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून चार कोटी ८९ लाख ७२ हजार ७५ रुपयांची मदत मिळणार आहे. संबंधित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याचे तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी सांगितले. खेड तालुक्यात चालू वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. खेड तालुक्यात खरीप हंगामातील पिकाचे सरासरी क्षेत्र ५० हजार ७०२ हेक्टर असून, प्रत्यक्षात ४८ हजार ५४६.२५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या व लागवडी झाल्या होत्या. यापैकी अतिवृष्टीमुळे ४२४.०७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकमुखाने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती.
खरीप हंगाम सुरू झाल्यावर जवळपास दीड महिना पडत असलेल्या पावसामुळे शेतीची कामे करता आली नसल्याचे चित्र होते. सततच्या पावसाने शेतांमध्ये वापसा नसल्याने शेतांमध्ये पाणी साचून राहून दलदल तयार झाली होती.जिरायती क्षेत्रामध्ये एकूण ३० गावांमधील ४७८ शेतकरी बाधित झाले असून, यामध्ये सोयाबीन २१६.६१ हेक्टर, भात ११ हेक्टर, भुईमूग ११ हेक्टर, बाजरी १.४५ हेक्टर, राजमा ०.३० हेक्टर, ज्वारी ०.२० हेक्टर व इतर पिकांचे ३२.२ हेक्टर असे २७२.७६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. एकूण बाधित जिराईत पिकास मदतीचे दर ८५०० रुपये हेक्टरप्रमाणे दोन कोटी १८ लाख ८४ हजार ६० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु