
रत्नागिरी, 7 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात शनिवारी, दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता 'कंबोडियातील जलव्यवस्थापनाची रहस्यमय तंत्रे' या विषयावर डॉ. अजित वर्तक दृक्श्राव्य संवाद साधणार आहेत.
यानिमित्ताने लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात कोकणच्या जलव्यवस्थापनाचा तौलनिक विचार केला जाणार आहे. डॉ. वर्तक वाचनालयाच्या वस्तुसंग्रहालयाशी जोडले गेलेले व्यासंगी व्यक्तिमत्त्व आहे. कंबोडिया हा भारतीयांच्या आस्थेचा विषय आहे. कंबोडिया, अंकोर साम्राज्य, तेथील प्राचीन मंदिरे, संस्कृती, त्यांचे कोकण प्रदेशाशी असणारे साम्य, अंकोर साम्राज्याचा ऱ्हास अशा अनेक गोष्टींच्या औत्सुक्याला समाधानकारक उत्तरे या व्याख्यानात मिळू शकणार आहेत. अंकोर साम्राज्याचा उदय, उत्कर्ष आणि ऱ्हास याला कारण असणाऱ्या पाण्यासोबतच दगड, जमीन, हवामान, पाऊस या विषयांशी कंबोडियाचे कोकणाशी असणारे साम्य, कोकणाच्या भविष्यकालीन नियोजनासाठी दिशादर्शी असेल. कंबोडिया आणि कोकण याचा तौलनिक विचारही या व्याख्यानाच्या निमित्ताने होणार आहे.
या व्याख्यानाला अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन वाचन मंदिराचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष अरुण इंगवले, कार्यवाह धनंजय चितळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी