
नाशिक, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।
कालिकामाता ग्रामदैवत मंदिर हॉल,मुंबई नाका येथे आज मराठा समाजाच्या विविध संघटनांची एकत्रित बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. बैठकीस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,तर कालिकामाता ग्रामदैवत मंडळाचे अध्यक्ष केशवाना पाटील यांनी अध्यक्षस्थानी कार्यभार सांभाळला.
या बैठकीत महामंडळाचे पोर्टल गेल्या एका महिन्यापासून बंद असणे तसेच गेल्या सहा महिन्यांपासून लाभार्थ्यांना अनियमित व्याज परतावा मिळणे या गंभीर प्रश्नांवर चर्चा झाली.हजारो मराठा उद्योजक आणि तरुणांना या निर्णयांमुळे आर्थिक फटका बसला असून नवीन व्यवसाय कर्जे बंद झाल्याने अनेकांचे उद्योजकीय स्वप्न धुळीस मिळाले आहे.
उपस्थित मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी महामंडळाच्या कामकाजात जाणूनबुजून अडथळे आणले जात असल्याचा आरोप करत अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना जाब विचारला.यावर उत्तर देताना पाटील म्हणाले महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख साहेब जाणूनबुजून सर्व काही करत आहेत ते काही मंत्र्यांच्या सांगण्यावरून ही आडमुठे भूमिका घेत आहे पोर्टल चे काम हे दोन दिवसात झाले पाहिजे होते परंतु त्यांनी एक महिना झाला तरी ते काम अडवून ठेवले आहे आहे.तसेच काही मंत्रीही या मंडळाच्या कारभारात राजकारण आणत आहेत.मी समाजाच्या न्यायासाठी सतत प्रयत्नशील आहे,मात्र मला सुद्धा या महामंडळात काम करताना काही मर्यादा असल्याने मी एमडीच्या बाबत स्वतः निर्णय घेऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी न्याय देताना काही गोष्टी माझ्याकडून होत नाही परंतु आता या सगळ्या गोष्टींमध्ये मी सर्व प्रयत्न करून पाहिले त्यातून मार्ग निघत नसल्याने आपण मला आजच्या मिटींगला बोलावलं या मीटिंगमध्ये आपण जे काही प्रश्न मला विचारले ते अगदी रास्त आहे म्हणून आता मराठा संघटनांनी जी भूमिका घेईल तीच माझी भूमिका असेल,असे स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले.आपण मंत्री महोदयांकडे जात असताना मी येण्याची अपेक्षा केली मी तुमच्या सगळ्यांच्या पुढे या मीटिंगसाठी असेल या महामंडळाच्या उन्नतीसाठी मी प्रथम मराठा आहे आणि नंतर या महामंडळाचा अध्यक्ष आहे त्यामुळे एक मराठा म्हणून जी समाजाची भूमिका असेल त्या भूमिकेत मी सहमत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
या वक्तव्याने सभागृहात उपस्थित सर्व मराठा संघटनांनी एकमुखाने संघटित लढ्याची भूमिका घेत,पुढील मंगळवारी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर भेट घेऊन या प्रश्नांवर थेट चर्चा करून तोडगा काढण्याचा निर्णय घेतला.
या बैठकीत सकल मराठा समाजाचे नेते करण गायकर यांनी महामंडळाच्या विषयावर ठोस आणि अभ्यासपूर्ण मांडणी करत सांगितले की,अण्णासाहेब पाटील महामंडळ हे मराठा समाजासाठी आशेचा किरण आहे.मात्र,सध्या काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे समाजातील तरुण उद्योजक त्रस्त झाले आहेत.जर शासनाने तात्काळ तोडगा काढला नाही,तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही देऊ,”असा इशारा त्यांनी दिला.
नाशिक जिल्ह्यातील ही बैठक मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक हक्कांसाठीच्या आगामी लढ्याचा निर्णायक टप्पा मानला जात आहे. आता सर्वांच्या नजरा येत्या मंगळवारी होणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी होणाऱ्या भेटीकडे लागल्या आहेत,जिथे मराठा संघटना आपल्या मागण्यांसाठी ठोस निर्णय घेणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV