
रायगड, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील वकिलांसाठी जिल्हा विधिसेवा प्राधिकरण रायगड-अलिबागतर्फे पाच दिवसांचे (४० तासांचे) मेडिएशन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश माणगाव तसेच प्रशिक्षक एस. टी. भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या सचिव तेजस्विनी निराळे यांनी या प्रशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी मेडिएशनच्या माध्यमातून वाद निराकरणाची प्रक्रिया अधिक सोपी, कार्यक्षम आणि वेळेची बचत करणारी कशी ठरते, याबाबत माहिती दिली.
रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रसाद पाटील यांनी आपल्या भाषणात मेडिएशनचे फायदे सांगताना म्हटले की, “वादग्रस्त पक्षकारांना आपले प्रकरण जलदगतीने निकाली काढण्यासाठी मेडिएशन हा प्रभावी मार्ग आहे. यामुळे वेळ, पैसा आणि न्यायालयाचे ओझे कमी होते.” पूर्वी या प्रशिक्षणासाठी वकिलांना ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथे जावे लागत होते, परंतु आता अलिबागमध्येच प्रशिक्षणाची सोय केल्याबद्दल त्यांनी सचिव तेजस्विनी निराळे यांचे आभार मानले.
अध्यक्षीय भाषणात प्रशिक्षक एस. टी. भालेराव यांनी वकिलांनी अधिकाधिक प्रमाणात मेडिएशनचा प्रसार करावा, असे आवाहन केले. त्यांनी वाद सोडविताना संयम, तटस्थता आणि संवाद कौशल्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रशिक्षणामध्ये न्यायाधीश एम. आर. जाधव (नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई) हेही मार्गदर्शन करणार असून रायगड जिल्ह्यातील सुमारे ४० वकील सहभागी झाले आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बार असोसिएशनचे खजिनदार अॅड. राजेंद्र माळी यांनी केले, तर ज्येष्ठ वकील अॅड. विनोद घायाळ यांनी आभार प्रदर्शन केले. या वेळी उपाध्यक्ष अॅड. अनंत पाटील, सचिव अॅड. अमित देशमुख आणि जिल्हा न्यायालयाचे व्यवस्थापक महेश दायमा उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके