
रत्नागिरी, 7 नोव्हेंबर, (हिं. स.) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्य मानसिक आरोग्य व प्राथमिक आरोग्य सेवा कार्याशाळा आज झाली. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा येथील स्वयंवर सांस्कृतिक भवनात पार पडली.
कार्यशाळेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक विकास कुमरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत सकाळच्या सत्रात प्राथमिक आरोग्य सेवा, तर दुपारच्या सत्रात मानसिक आरोग्य सेवा यावर चर्चासत्र झाले. श्री. विनायक यांनी आशा सेविका, तालुका वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्याशी संवाद साधताना त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या व आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांसंदर्भात मार्गदर्शन केले. मानसिक आरोग्यासंबंधी लोकांमध्ये जागरूकता पसरविण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेत आरोग्य विभागाच्या विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांचे विविध गट पाडून त्यांच्यात शासनाच्या आरोग्याविषयी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता अनुभवाची देवाणघेवाण होण्यासाठी चर्चा घडवून आणली.
कार्यशाळेला वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी