शिक्षण संस्थांच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष देण्याची गरज- जिल्हाधिकारी
गडचिरोली., 7 नोव्हेंबर (हिं.स.) शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रशासकीय यंत्रणांनी लक्ष देण्याची आवश्यकता नमूद करत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन समाजाच्या विकासात योगदान देण्याचे आव
विद्यार्थ्यांचे संवाद साधताना जिल्हाधिकारी


गडचिरोली., 7 नोव्हेंबर (हिं.स.)

शैक्षणिक संस्थांच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रशासकीय यंत्रणांनी लक्ष देण्याची आवश्यकता नमूद करत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन समाजाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी घोट आणि चामोर्शी भागाचा काल दौरा करून विविध शासकीय संस्था आणि विकास कामांची पाहणी केली. यावेळी जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम., तहसीलदार प्रशांत घोरुडे, मुख्याध्यापिका ममता लांजेवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

नवोदय विद्यालय येथील कामांना गती देण्यासाठी त्यांनी शासनाकडून प्राप्त झालेल्या १९ कोटी रुपयांमधून कोणकोणती कामे पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने करायची आहेत, याचे सविस्तर नियोजन व अंदाजपत्रक सादर करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागाने प्रत्यक्ष विद्यालयास भेट देऊन पाहणी करावी आणि कामाचे नियोजन सादर करावे. नियोजित कामांचे वर्गीकरण करून राज्य स्तरावरून, जिल्हास्तरावरुन आणि सीएसआर फंडातून कोणती कामे करता येतील, याचा समावेश नियोजनात करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः नवोदय विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कोणत्या सुविधा, यंत्र किंवा उपचार आवश्यक आहेत, याकरिता जिल्हा शल्य चिकित्सकांनी आपल्या टीमसह घोट येथे येऊन विद्यार्थ्यांची तपासणी करावी आणि अहवाल सादर करण्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम विभागाने विद्यालयाशी संपर्क साधून स्वच्छतागृह तयार करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावेत, तसेच ५०० ते ६०० क्षमतेच्या सभागृहात अद्ययावत विद्युत व्यवस्था आणि बैठक व्यवस्थेचे अंदाजपत्रक व नियोजन तसेच भोजनस्थळ दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रसंगी, जवाहर नवोदय विद्यालय घोट येथील इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी भूमिका तिरुपती चिट्याला हिने जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे पोर्ट्रेट चित्र तयार करून त्यांना भेट दिले.

नवोदय विद्यालयाच्या भेटीनंतर जिल्हाधिकारी पंडा यांनी महात्मा गांधी जिल्हा परिषद हायस्कूल, घोट येथे भेट देऊन पाहणी केली. येथे त्यांनी अर्धवट असलेले वर्गखोली बांधकाम तात्काळ एका महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच, नरेगा योजनेंतर्गत शाळेच्या पटांगणाची दुरुस्ती करावी आणि ओपन जिम व डायनिंग एरियासाठी तात्काळ अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश दिले.

यानंतर जिल्हाधिकारी यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, चामोर्शी येथे भेट देऊन बांधकाम स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, शाळा इमारतीचे बांधकाम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करून उद्घाटनासाठी उपलब्ध करून देण्यात यावे. यासोबतच, मुलींचे वसतीगृह बांधकाम तातडीने पूर्ण करावे आणि कर्मचारी निवासस्थानाचे बांधकाम जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करावे.

या प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या भेटींव्यतिरिक्त, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी घोट येथे लोक मंगल प्रकल्प ला भेट दिली, तसेच पीक नुकसान पंचनामा कामाची प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. व चामोर्शी येथे क्रीडा संकुल आणि नवीन तहसील कार्यालय इमारतीच्या कामाची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित विभागांना दिल्या.

यावेळी विविध यंत्रणेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande