
पुणे, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। पुणे आर्थिक क्षेत्राचा ‘पुणे ग्रोथ हब’ प्रारुप आर्थिक बृहत् आराखडा लवकरात लवकर तयार करण्याच्यादृष्टीने सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात यावी. यामध्ये सर्व संबंधित घटक, नागरिकांडून उपलब्ध बाबींची माहिती जमा करणे तसेच सूचना घेण्याच्यादृष्टीने सर्वेक्षण नमुना तयार करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या. 'पुणे महानगर ग्रोथ हब' बाबत विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, आयएसईजीचे संचालक शिरीष संखे उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, पुणे आर्थिक क्षेत्राला जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान निर्माण करून देण्याच्या दृष्टीने नीती आयोगाने ‘ग्रोथ हब’ उपक्रमात पुणे महानगर प्रदेशाचा समावेश केला आहे. त्याअंतर्गत प्रारूप बृहत आर्थिक विकास आराखडा लवकरात लवकर आयोगाला सादर करायचा आहे. त्यादृष्टीने पुणे व परिसरातील सध्याच्या आर्थिक क्षमता, उपलब्ध सुविधा, परिसराची बलस्थाने आदींची माहिती जमा करतानाच भविष्यातील आव्हाने, सुधारणा अपेक्षित असणाऱ्या बाबी यांची माहिती जमा करून सर्वंकष आराखडा तयार करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.डॉ. पुलकुंडवार पुढे म्हणाले, हे सर्वेक्षण आपल्या जीवनात भविष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्यादृष्टीने होत असल्याची भावना नागरिक तसेच सर्व घटकांमध्ये तयार होईल अशा पद्धतीचा विचार सर्वेक्षण नमुना तयार करताना करण्यात यावा. तसेच जमा करण्यात येणाऱ्या माहितीची अचूकता व गुणवत्ता यावर सर्वाधिक भर देण्यात यावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु