
रायगड, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। आगामी अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपद “सर्वसाधारण महिला” या प्रवर्गासाठी राखीव ठरल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दशकानुदशके अलिबाग नगरपरिषदेवर पुरुष नेत्यांचे वर्चस्व राहिले असताना, आता महिला नेतृत्वाच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निर्णयामुळे शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. प्रवीण ठाकूर, भाजपचे ॲड. अंकित बंगेरा आणि शिवसेनेचे मुन्ना कोटियन यांसारख्या दिग्गज दावेदारांना स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. परिणामी, सर्वच पक्षांत महिला उमेदवारांच्या निवडीसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. शेकापमधील चुरस:
नगरपरिषदेत दीर्घकाळ वर्चस्व राखणाऱ्या शेतकरी कामगार पक्षात माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या अक्षया नाईक या प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत आहेत. तसेच ॲड. मानसी म्हात्रे, ॲड. नीलम हजारे, अश्विनी पाटील आणि सुषमा पाटील ही नावेही चर्चेत आहेत. जर अक्षया नाईक यांना उमेदवारी मिळाली आणि त्या विजयी झाल्या, तर त्या नाईक कुटुंबातील सहाव्या नगराध्यक्ष ठरतील.
राष्ट्रवादी काँग्रेसची सावध रणनीती:
या पक्षाकडून माजी नगरसेविका ॲड. कविता ठाकूर आणि काजल अमीर ठाकूर यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. दोघींचा मतदारांशी चांगला संपर्क असून, पक्षातील वरिष्ठ नेते प्रवीण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला नेतृत्व पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिंदे गटाची तयारी:
आमदार महेंद्र दळवी यांच्या सुनबाई अदिती दळवी या शिंदे गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून आघाडीवर आहेत. त्यांच्या शिक्षण, सामाजिक कार्य आणि कुटुंबीयांचा राजकीय अनुभव यामुळे त्या दमदार दावेदार मानल्या जात आहेत.
दरम्यान, भाजपकडून अद्याप अधिकृत उमेदवार निश्चित करण्यात आलेला नसला तरी स्थानिक पातळीवर काही नव्या चेहऱ्यांची चर्चा सुरू आहे.
अलिबाग नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीत परंपरेचे प्रतीक अक्षया नाईक आणि परिवर्तनाचे प्रतीक अदिती दळवी किंवा कविता ठाकूर यांच्यातील सामना रंगणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या निवडणुकीतून अलिबागच्या राजकीय परंपरेत “महिला सत्तेचा नवा अध्याय” सुरू होईल, अशी सर्वसाधारण चर्चा शहरात रंगली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके