
सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।
अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने जी नुकसान भरपाई द्यायला सुरू केेली आहे. ती देत असताना मागच्या मे किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला त्यावेळी पिकाची जी काही नुकसान भरपाई दिली होती ती रक्कम आत्ताच्या रकमेतून वजा करून शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे देत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. शासनाने सरसकट भरपाई देण्याचे आश्वासन पाळले नाही. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याची टीका शरदचंद्र पवार पक्षाचे संजय पाटील -घाटणेकर यांनी केली. सरसकट नुकसान भरपाई न दिली गेल्यास ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी माढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
घाटणेकर पुढे म्हणाले, राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरू झाले आहेत. शासनाने घोषणा करताना 32 हजार कोटी रुपयांची आम्ही शेतकऱ्यांना मदत करू अशा प्रकारची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर नऊ हजार रुपये, सात हजार रुपये, बारा हजार रुपये अशा प्रकारच्या तुटपुंज्या रकमा जमा झाल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड