
सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।
सोलापूर विमानतळावर मुंबईहून आलेले विमान उतरताना पंख्यात नायलॉनचा मांजा अडकल्याची तक्रार पायलटने नुकतीच विमानतळ अधिकाऱ्यांकडे केली होती. विमानतळ अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिसांना सांगितले, तरीही परिसरात पतंग उडविणे सुरूच होते. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिस नई जिंदगी परिसरातील दुकानांची झडती घेतली. तर संरक्षक भिंतीवरून विमानतळ आवारात पतंग उडविणाऱ्या चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विमानसेवेला प्रामुख्याने मोकाट जनावरे, पक्षी, ड्रोन, पतंग अशा गोष्टी अडथळा ठरतात. त्यामुळे विमानतळ परिसरात कत्तलखाने, कचराडेपो, चिकन-मटण विक्री दुकानांना परवानगी नसते. तरीही, बु सोलापूर विमानतळाजवळच मुलांनी उडविलेल्या पतंगाचा मांजा विमानाच्या पंख्यातच अडकला. पायलटला लगेच त्याचे इंडिकेशन मिळाले. त्याने विमानतळ अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली. विमान सुरक्षित उतरले, पण अधिकाऱ्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना त्यासंदर्भातील माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड