मलेरिया प्रतिबंधासाठी सोलापूर महानगरपालिकेचा विशेष उपक्रम
सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त श्री. आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य विभागामार्फत मलेरियापासून बचाव व प्रतिबंधात्मक उपाययोजना शहरभर राबविण्यात येत आहेत. महानगरप
smc


सोलापूर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त श्री. आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य विभागामार्फत मलेरियापासून बचाव व प्रतिबंधात्मक उपाययोजना शहरभर राबविण्यात येत आहेत.

महानगरपालिकेच्या सर्व १ ते ८ विभागीय कार्यालयांच्या हद्दीत एकूण ६० क्षेत्र कार्यकर्ते दररोज दोन सत्रांमध्ये काम करत आहेत. हे कर्मचारी शहरातील पाणी साचलेले खड्डे, गटारी, डबके, तसेच इतर डास उत्पन्न होणाऱ्या ठिकाणी नियमितपणे डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करत आहेत. या मोहिमेचा उद्देश डासांची उत्पत्ती कमी करणे व मलेरियाचा प्रादुर्भाव रोखणे हा आहे.

तसेच नागरी आरोग्य केंद्राच्या आशा सेविका व आरोग्य सेवकांच्या माध्यमातून घराघरांत सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांना डास प्रतिबंधासाठी जागरूक केले जात आहे. घरातील पाण्याची टाकी, फुलदाणी, कुलर, पाण्याच्या साठवणीच्या भांड्यांमध्ये पाणी साचू न देण्याचे आणि नियमित स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ऑक्टोबर महिन्यापर्यंत आरोग्य विभागामार्फत ८,८१६ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून या माध्यमातून नागरिकांमध्ये मलेरियाविषयी जनजागृती करण्यात आली आहे.मलेरिया हा प्लास्मोडियम नावाच्या परजीवीमुळे होणारा आजार आहे, जो मादी ॲनोफिलीस डासाच्या चावण्यामुळे पसरतो. या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे — वारंवार येणारा तीव्र ताप, थंडी वाजणे, घाम येणे, तसेच डोकेदुखी, अंगदुखी, थकवा, मळमळ किंवा उलट्या होणे इत्यादी.

अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी सौ. राखी माने यांनी केले आहे. वेळेत निदान व योग्य उपचार घेतल्यास मलेरियासारख्या गंभीर आजाराचा धोका टाळता येतो, असे त्यांनी सांगितले.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या परिसरात पाणी साचू देऊ नये, स्वच्छता राखावी, आणि डास प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande