‘वंदे मातरम्’ गीताला विद्यार्थ्यांकडून सलाम - म्हसळा आयटीआयचा उपक्रम
रायगड, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। देशभक्तीच्या भावना जागृत करणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण झाली असून, या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पद्मविभूषण पांडुरंग शास्त्री आठवले शासकीय औद्य
१५० वर्षांच्या ‘वंदे मातरम्’ गीताला विद्यार्थ्यांकडून सलाम — म्हसळा आयटीआयचा उपक्रम


रायगड, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। देशभक्तीच्या भावना जागृत करणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या गीताला यंदा १५० वर्षे पूर्ण झाली असून, या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पद्मविभूषण पांडुरंग शास्त्री आठवले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा यांच्या वतीने भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथे उत्साहात पार पडला.

या विशेष दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात चित्रकला, देशभक्तिपर गीतगायन आणि भाषण स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. चित्रकला स्पर्धेत कु. स्वराज संतोष उद्धरकर (इयत्ता आठवी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर दिया बेटकर यांनी द्वितीय आणि सिद्धांत जाधव यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास तहसीलदार सचिन खाडे, ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे, शाळा चेअरमन समीर बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस महादेव पाटील, मुख्याध्यापक डी. आर. पाटील, शिक्षक एकनाथ पाटील, भाजप रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष निलेश मांदाडकर तसेच भारतीय सैन्य दलाचे माजी सैनिक गिते उपस्थित होते. संस्थेचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली असून, “वंदे मातरम्” या गीताच्या माध्यमातून मातृभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande