
पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।तब्बल दिड हजार पणत्या प्रज्वलित करून साकारलेली अक्षरे... पाचशे विद्यार्थ्यांनी खड्या आवाजात केलेले वंदे मातरम् चे समूहगान... अशा देशभक्तीने भारलेल्या वातावरणात वंदे मातरम् या अजरामर गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त १५०० हजार दीप प्रज्वलित करण्यात आले.
स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला इतिहास प्रेमी मंडळ आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व लेखक प्रा. डॉ.न. म. जोशी, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी उपस्थित होते.
मैदानावर वंदे मातरम् ही अक्षरे रेखाटण्यात आली होती. कविवर्य ग.दि. माडगूळकर लिखित ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ हे गीत गात १५०० पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. तसेच तब्बल ५०० विद्यार्थ्यांनी अजय पराड यांनी संगीतबद्ध केलेल्या वंदे मातरम् गीताचे समूहगान सादर केले.
डॉ.न म.जोशी म्हणाले, क्रांतीची ज्वाला कधीही विझत नाही. राष्ट्र प्रेमासाठी अर्पण होणारे विद्यार्थी व्हा. राष्ट्रप्रेम आणि सदवर्तन ठेवा. वंदे मातरम हे गीत नाही तर ऊर्जा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मोहन शेटे म्हणाले, बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी वंदे मातरम् हे गीत ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट केले होते. १९०५ मध्ये झालेल्या वंगभंगविरोधी आंदोलनात या गीताला जणू रणघोषाचे स्वरूप प्राप्त झाले. आम्ही भारतीय लोक राष्ट्राला केवळ जमीन मानत नाही, तर ‘आई’ म्हणून तिचे पूजन करतो, हाच आपला सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे.
बंगालचे महाकवी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी वंदे मातरम् या गीताची रचना केली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात या गीताने जनतेच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली. या भावनेचा गौरव करण्यासाठीच हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला. ज्ञान प्रबोधिनीचे श्रीरंग टोके यांनी आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु