
जळगाव, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात वंदे मातरम गीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदे मातरम गीताचे सामूहीक गायन आज दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्य.प. सदस्य प्रा. पवित्रा पाटील, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, अधिसभा सदस्य प्रा. धीरज वैष्णव, मिनाक्षी निकम, वैशाली वराडे, सीए रवींद्र पाटील, प्रा. योगेश पाटील व डॉ. जयेंद्र लेकुरवाळे आदिंची उपस्थिती होती.
राष्ट्रकवी बंकिंमचंद्र चटोपध्याय यांनी ७ नोव्हेंबर १८७५ ला वंदे मातरम गीत लिहिले. आज या गीताचा १५० वा वर्धापन दिन आहे. या निमित्त राज्यशासनाकडून वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या अनुषंगाने हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. या प्रसंगी विद्यापीठातील प्रशाळांचे संचालक, शिक्षक, इंद्रधनुष्य स्पर्धेचे आलेले विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी, शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी व कलावंत यांनी वंदेमातरम गीताचे सामूहिक गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्ष अधिकारी प्रवीण चंदनकर यांनी केले. ध्वनी व्यवस्था बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता सुनील नेमाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर