वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी २०० सीसीटीव्ही
पुणे, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। आळंदी परिसरातील चाकण, धानोरे, मरकळ औद्योगिक भागात जाणाऱ्या जड वाहनांना शहरातून कार्तिक वारी कालावधीत सोमवार (ता. १०) ते गुरुवार (ता २०) प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने घातपात, गुन्हे प्रत
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी २०० सीसीटीव्ही


पुणे, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। आळंदी परिसरातील चाकण, धानोरे, मरकळ औद्योगिक भागात जाणाऱ्या जड वाहनांना शहरातून कार्तिक वारी कालावधीत सोमवार (ता. १०) ते गुरुवार (ता २०) प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने घातपात, गुन्हे प्रतिबंध करण्याकरता तात्पुरत्या स्वरूपात २०० हुन अधिक सीसीटीव्ही शहरांमध्ये बसविले जातील. भाविकांना इंद्रायणीकाठी मंदिर परिसरात प्रदक्षिणा रस्त्यांवर सूचना देण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनिक्षेपक लावले जाणार आहेत. या नागरी सूचना केंद्राचा एक नियंत्रण कक्ष आळंदी पोलिस ठाण्यामध्ये असणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली.

कार्तिक वारीच्या पोलिस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या तयारी बाबत माहिती देताना नरके म्हणाले, ‘‘आळंदी व दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये बुधवार (ता. १२) ते मंगळवार (ता. १८) या काळात वारीसाठी राज्यभरातून साडेचारशे दिंड्यांसह सुमारे पाच लाख वारकरी येतात. शहरातील ३८५ धर्मशाळा, मठ तसेच मोकळ्या जागेवर तंबूच्या माध्यमातून मुक्कामाची व्यवस्था करतात. आळंदी परिसरातील गावांमध्ये एक ते दीड लाख वारकरी वास्तव्यास असतात. पाच ते सहा लाख भाविकांच्या मालमत्ता तसेच जीविताचे संरक्षण करण्याची जबाबदारी आणि कायदा व्यवस्था प्रस्थापित ठेवणे हा वारीच्या काळात प्रमुख उद्देश आहे.

वारी काळात प्रदक्षिणा रस्त्यासह प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या गर्दीमुळे भाविकांना त्रास होऊ नये यासाठी दिंडी व्यतिरिक्त अन्य वाहनांना बंदी करण्यात आली आहे. आपत्कालीन वाहतूक करणाऱ्या तसेच स्थानिक नोकरदार वर्गांच्या वाहनांना पोलिस ठाण्यांकडून वाहन पास परवाना दिला जाईल. दिंडी वाल्यांनी धर्मशाळेसमोर वाहने उभी न करता ती धर्म शाळेच्या आतील भागात उभी करावीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande