
पुणे, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत प्रमाणपत्र तपासणीत ४६ शिक्षकांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण हे ४० टक्क्यांहून कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे जिल्हा परिषदेने निश्चित केले आहे. अद्याप ३१४ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी शिल्लक आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन बदलीचा फायदा घेत असून या सर्वांची फेरतपासणीची मागणी विविध संघटनांनी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या प्रमाणपत्र फेरतपासणी करण्याचे ठरविले. जवळपास पाच महिन्यानंतर १७८ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेर तपासणी पूर्ण झाली असून, ३१४ शिक्षकांची बाकी आहे.सुरुवातीला फेरतपासणी कुणी करावी यावरून टोलवाटोलवी झाली होती. पुण्याच्या शासकीय रुग्णालयांनी असमर्थता दर्शविल्यानंतर थेट मुंबईमध्ये ही तपासणी करण्याचे ठरविले होते. परंतु, पुन्हा आरोग्य उपसंचालकांकडे आणि ससून रुग्णालयामध्ये फेरतपासणी करण्याचे निश्चित झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु