उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची बसपाची मागणी
पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यभरात सध्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वतनाच्या जमीन घोटाळा प्रकरण चर्चिले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं थेट नाव या घोटाळ्याशी जोडलं गेल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी ख
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची बसपाची मागणी


पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।

राज्यभरात सध्या पुण्यातील कोरेगाव पार्क येथील वतनाच्या जमीन घोटाळा प्रकरण चर्चिले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं थेट नाव या घोटाळ्याशी जोडलं गेल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा इथपर्यंत हे प्रकरण येऊन ठेपलं आहे. त्यातच आज बारामतीत बहुजन समाज पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद घेत पुण्यातील प्रकरणासह राज्यभरातील वतनाच्या जमिनीची श्वेतपत्रिका काढण्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी बारामती तालुक्यातील व राज्यभरातील महार वतनाच्या जमिनी बळकवल्याबाबत चौकशी करण्याबाबतचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. सदर पत्रात महार वतनाच्या जमिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या हस्तकांच्या नावे बऱ्याच प्रमाणात बळकावून समाजाला भूमिहीन केलं आहे. यात बऱ्याच महसूल अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande