
पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।
पुण्यातील कोंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी चांगलंच राजकीय वातावरण तापलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांची भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवाणी यांच्यासह रवींद्र तारु यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बावधन पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. ज्या ठिकाणी दस्त नोंदणी झाली, त्या नोंदणी कार्यलयातील संबंधित जमीनीच्या गैरव्यवहार प्रकरणातील नोंदणी केलेले दस्त जप्त करण्यात आले आहेत. ही जप्तीची कारवाई बावधन पोलिसांनी केली.
अधिकच्या तपासासाठी दस्त नोंदणी चे कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. अशी माहिती बावधन पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल विभूते आणि त्यांची टीम नोंदणी कार्यालयात पोहचली होती. नोंदणी केलेले दस्त या प्रकरणाची दिशा ठरवू शकतात. कोंढवा येथील ४० एकर जमीन पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या कंपनीने अवघ्या ३०० कोटींमध्ये खरेदी केली. ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या नावे आहे. सात बारा देखील शासनाच्या नावे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु