
पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्ज कंपनीशी संबंधित आणखी एका जमीन व्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कृषी खात्याकडे बोपोडी येथील पाच हेक्टर जमिनीचा ताबा असताना तहसीलदारांना हाताशी धरून जमिनीचा अपहार करून बेकायदा आदेश आणि पत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याच्या तक्रारी प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह खडक पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नायब तहसीलदार प्रविणा शशिकांत बोर्डे (५०) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील मामलेदार कचेरीत १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रविणा बोर्डे या नायब तहसीलदार म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे नेमणुकीस आहेत. त्यांनी सरकारकडून प्राधिकृत अधिकारी म्हणून तक्रार दिली आहे. सूर्यकांत येवले तहसीलदार म्हणून शहर मामलेदार कचेरी येथे नियुक्तीस हाेते. १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ या कालावधीत त्यांनी अधिकारपदाचा गैरवापर केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु