
पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। वंदे मातरम् गीताने स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्यांसाठी ताकद दिली त्यामुळेच ते प्रेरणा गीत आहेच, तसेच फाशीवर जाणाऱ्यांना आत्मबळ दिले त्यामुळे ते बलिदान गीत सुध्दा आहे, तसेच ते युध्द गीत आहे, समर गीत आहे, एकता गीत, अभिमान, आणि भारतमातेला वंदन करणारे मातृगीत सुध्दा आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित ‘वंदे मातरम्’ गीतनिर्मितीच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त वंद्य वंदे मातरम् या उपक्रमाचे उद्घाटन आज मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. यावेळी या उपक्रमातंर्गत विद्यापीठातर्फे आयोजित विविध स्पर्धा आणि पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. राष्ट्रीय गीताच्या गौरवशाली परंपरेला विद्यार्थ्यांच्या सर्जनशील सहभागातून अभिवादन करण्याच्या उद्देशाने विद्यापीठात प्रश्नमंजुषा, सुलेखन, निबंध, पोस्टर, काव्यलेखन, वक्तृत्व आणि राष्ट्रभक्तीपर रील अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय अस्मिता नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे, असे गौरव उद्गार मंत्री शेलार यांनी यावेळी काढले.
यावेळी विद्यापिठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य, श्री. रविंद्र शिंगणापूरकर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर