
सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। विजापूर नाका पोलिसांच्या हद्दीतील समर्थ ज्वेलर्स दुकानात दरोड्या टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना पोलिसांनी जेरबंद केले. गुन्ह्यात एक विधीसंघर्षग्रस्त बालकही आहे. लाखोंचे दागिने असलेले ज्वेलर्स दुकान, कामगार आणि ग्राहकांची गर्दी कमी व सहज पळून जाता येईल, अशा दुकानाची दोघांनी रेकी केली होती. त्यानंतर सात जणांनी मिळून समर्थ ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न केल्याची बाब तपासात उघड झाली आहे.
गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिसांनी लिमयेवाडी, मजरेवाडी भागातील सर्वच गल्लीबोळात पोलिस शोध घेत होते. त्यांना पाच दिवसांत यश मिळाले आहे.गुन्ह्यातील संशयित आरोपी अजिंक्य चव्हाण (रा. वारजे माळेवाडी, पुणे), विशाल जाधव (रा. तुळजापूर), समर्थ समीर गायकवाड, सार्थक दशरथ गायकवाड, अनिकेत पांडुरंग गायकवाड, साहील दशरथ गायकवाड हे एकत्र आले. दमाणी नगरातील गोल्डन जीमसमोरील मैदानात त्यांनी दरोड्याचा प्लॅन आखला. साहील व समर्थ यांनी दुकानाची रेकी केली आणि दरोड्याचे दुकान निश्चित केले. दरोड्यासाठी त्यांनी पावणेआठची वेळ निवडली. दरोड्यासाठी दोन दुचाकी घेऊन सहाजण दुकानाजवळ पोचले. पण, दुकानदाराच्या आरडाओरडीमुळे लोक जमू लागले आणि ३० सेकंदातच ते पसार झाले. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने साहील गायकवाड, समर्थ गायकवाड, सार्थक गायकवाड व अनिकेत गायकवाड यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्तास जेरबंद केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड