
सोलापूर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। टेंभुर्णी एमआयडीसी परिसरात अवैध मुरूम माफियांनी अक्षरशः हैदोस असून त्यांच्या कारनाम्यामुळे टेंभुर्णी शहरासह सहा-सात गावांना दोन दिवस विजेचा नाहक त्रास सहन करावा लागला असल्याचे समोर आले आहे. मुरूम काढताना जेसीबीचा 33 केव्ही वीज वाहक पोलला धक्का लागून लोखंडी पोल वाकल्याने दोन मेन लाईन एक झाल्या. यामुळे स्पार्किंग होऊन मोठा आवाज झाला. स्पार्किंगमुळे टेंभुर्णी शहरासह अनेक गावांचा वीजपुरवठा बंद झाला. मात्र जीवित हानी झाली नाही.
टेंभुर्णी शहर परिसरात अवैध मुरूम माफियांनी धुडगूस घातला असून एमआयडीसीत त्यांनी एकही खुला प्लॉट मुरूम न काढता व्यवस्थित ठेवला नाही. यावर महसूल, पोलिस अथवा एमआयडीसी या कुणाचे नियंत्रण नाही. यामुळे त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. एमआयडीसीतील ते वाटेल तेथील मुरूम काढतात अन दुप्पट रक्कम घेऊन हवा तेथे टाकतात. यामुळे तेथे त्यांचीच मनमानी सुरू आहे. या मुरूम माफियांना थोडे ही भान राहिले नाही. त्यांना कुणाचे ही ना भय ना भीती अशी अवस्था आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड