
लातूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने लातूर जिल्ह्यातील चार नगरपरिषदा व एका नगरपंचायतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती सोमवार दि 10 नोव्हेंबर रोजी लातूर येथे काँग्रेस भवनात होणार आहेत. त्यानंतर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश निवड समितीची बैठक १२ नोव्हेंबर रोजी होणार असून, यामध्ये उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीने आघाडी घेत आपली व्यूहरचना मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षनिरीक्षक नेमून संघटन बळकट केले आहे.
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित विलासराव देशमुख, खा. डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्षाकडे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस भवनात सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून घेण्यात येणार आहेत. सकाळी १० वाजता औसा नगर परिषदेसाठी, दुपारी १२ वाजता उदगीर नगर परिषदेसाठी, दुपारी २ वाजता अहमदपूर नगरपरिषदेसाठी, दुपारी ४ वाजता निलंगा नगरपरिषदेसाठी, तर सायंकाळी ६ वाजता रेणापूर नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होतील.माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा निवड समिती या मुलाखती घेणार असून या समितीमध्ये खा. डॉ. शिवाजी काळगे,माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख, जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्यासह निरीक्षक डॉ. जितेंद्र देहाडे, अलका राठोड, धनराज राठोड, डॉ.श्रावण रॅपनवाड, प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, प्रदेश सचिव श्रीशैल उटगे, प्रदेश सचिव विद्याताई पाटील, प्रदेश सचिव ॲड. समद पटेल, प्रदेश सचिव कल्याण पाटील, प्रदेश सचिव एन.आर.पाटील, प्रदेश सचिव डॉ. दिनेश नवगिरे यांचा समावेश आहे. मुलाखतीनंतर ही समिती इच्छुक उमेदवारांच्या शिफारसी प्रदेश काँग्रेसकडे पाठवेल. त्यानंतर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश निवड समितीची बैठक १२ नोव्हेंबर रोजी होणार असून, यामध्ये उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis