
मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.) - भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक आणि उमेदवारांच्या प्रवेशपत्राची लिंक विभागाच्या https://mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.
भूमि अभिलेख विभागातील उपरोक्त रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता १ ऑक्टोबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार विहीत कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात पुणे आणि अमरावती विभागात परीक्षा होणार असून या विभागात परीक्षा केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर सकाळी ८ वाजता उपस्थित राहावयाचे आहे. तर दुसऱ्या सत्रात नाशिक आणि नागपूर विभागांमध्ये केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी दुपारी १२ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे. दिनांक १४ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात मुंबई (कोकण) विभागात परीक्षा केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी सकाळी ८ वाजता तर दुसऱ्या सत्रात छत्रपती संभाजीनगर विभागात केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी दुपारी बारा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे. या परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहितीपुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे भूमि अभिलेख कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी