
बीड, 9 नोव्हेंबर (हिं.स.)ढगाळ वातावरण अन् पाऊस अशी स्थिती दिवाळीत यंदा राहिली आहे. परिणामी दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून बीड जिल्ह्यातील किमान तापमानात सतत घसरत होत असून कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत किमान तापमानाचा पारा ८ अंशांनी खाली आला आहे. दरम्यान, थंडीत यंदा कमालीची वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
यंदा ऑक्टोबरमध्ये राज्यात सरासरी कमाल तापमान ३० ते ३३ अंश, तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सियसदरम्यान होते. दिवाळीच्या काळात तापमानात घट झाली. मात्र, तरीही थंडीचा अनुभव फारसा जाणवला नाही. जिल्ह्यात किमान तापमान २४ ते २५ अंशांदरम्यान राहिले. नोव्हेंबरपासून तापमान २४ ते २२ अंशांवर खाली आले. त्यामुळे थंडीची चाहूल लागली. जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती.राज्यात कमालीची थंडी वाढली आहे. ही थंडी सलग सहा ते सात दिवसांसाठी राहणार आहे. किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानात घट झाल्याचे पहायला मिळणार आहे.
यंदा देशात काही भागांत किमान तापमान १ अंश सेल्सियसपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातही किमान तापमान सरासरीपेक्षा खाली जाणार आहे. या थंडीमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी उबदार कपडे वापरणे गरजेचे आहे. पुढील काही दिवस थंडी अधिक तीव्र होणार असल्याने नागरिकांनी सजग राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis