
रत्नागिरी, 9 नोव्हेंबर, (हिं. स.) : किती तरी लेखकांची जन्मशताब्दी होते; मात्र लेखकपत्नीची जन्मशताब्दी होण्याचा योग दुर्मीळ आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी काढले.
सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या माहेरी अर्थात रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या विशेष उपक्रमाच्या समारोपाच्या दिवशी आज त्या बोलत होत्या. राज्य मराठी विकास संस्थेच्या आर्थिक सहकार्याने आर्ट सर्कल या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
मंगला गोडबोले यांनी सुनीताबाईंच्या जीवनाच्या विविध पैलूंचा आणि या दाम्पत्याच्या सहजीवनाचा आढावा आपल्या भाषणातून घेतला आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण मांडले. त्या म्हणाल्या, 'आहे मनोहर तरी'पूर्वीचे महिलांचे आत्मपर लेखन आणि त्यानंतरचे लेखन यात फरक आहे. 'आहे मनोहर तरी'चे अपूर्व असे स्वागत आजपर्यंत महाराष्ट्राने केले आहे. लेखन, अभिनय, नृत्य आदी कला स्वतःकडे असूनही, सुनीताबाई आयुष्यभर वावरल्या त्या पु. ल. देशपांडे यांच्या गृहिणी-सखी-सचिव म्हणूनच. 'आहे मनोहर तरी' या पुस्तकातून सुनीताबाईंनी जी एक धीटाई दाखवली आणि दिली, त्यानंतर पुष्कळ लेखक आणि कलावंतांच्या पत्नींचे असे आत्मपर लेखन प्रसिद्ध झाले. साधनशुचिता आणि कलेवरची अंतिम निष्ठा या दोन मूल्यांच्या साह्याने त्यांनी अतिशय निरलसपणे गृहिणीपण आणि सचिवपण पार पाडले,.
पु. ल. देशपांडे नावाचा एक बहुढंगी कलाकार त्यांनी महाराष्ट्राला मुक्तपणे मिळू दिला. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर लागतील ते कष्ट घेण्याची आणि वाईटपणा घेण्याची सदैव तयारी ठेवली. निर्मिक हा कलाक्षेत्राचा आधार असून, त्यांच्या हक्कांची पायमल्ली करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे सांगत त्यांनी लेखक, कलावंतांच्या स्वामित्वहक्कांसाठी महत्त्वपूर्ण लढा दिला. 'मला उमजलेल्या सुनीताबाई मी मांडत आहे,' असे सांगून मंगलाताई म्हणाल्या, सुनीताबाईंनी नेहमीच स्वतःच्या अटींवर जगणे पसंत केले. पु. ल. आणि सुनीताबाई यांचे सहजीवन म्हणजे दोन अतिशय विसंगत माणसांचे सहजीवन होते. त्यांनी कधीही मी लेखिका आहे, अभिनेत्री आहे असे म्हटले नाही. सुनीताबाईंच्या 'आहे मनोहर तरी'चे पु. ल. देशपांडे यांनीही कौतुकाने स्वागत केले आहे. पु. ल. देशपांडे म्हणाले होते, की 'सुनीताने माझं देवत्वाचं कवच काढलं, ते फार बरं झालं. एखाद्याला देव केलं, की त्याला आयुष्यभर तसं राहण्याची आणि माणूस न राहण्याची सक्ती होते. माझ्यावरची ती सक्ती काढली ते बरं झालं.' महाराष्ट्राने या दांपत्याबद्दल ऋणी राहिले पाहिजे. कलेचा निर्माता हा संपूर्ण कलाक्षेत्राचा आधार आहे. त्याचा शब्द अंतिम आहे आणि त्याची पायमल्ली करण्याचा अधिकार कोणालाही नाही, हे सुनीताबाईंनी पहिल्यांदा सांगितले आणि अखेरपर्यंत सांगत राहिल्या.
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांनी 'आहे मनोहर तरी… बरंच काही' या विषयावर मनोगत व्यक्त केले. सुनीताबाईंचा मनोपिंड तत्त्वज्ञानाचा, प्रत्येक गोष्टीकडे गंभीरपणे बघण्याचा होता, तर पुलंचा मनोपिंड जीवनाचा रसिकपणे आस्वाद घेण्याचा होता. एक लेखिका म्हणून, एक तत्त्वचिंतक म्हणून 'आहे मनोहर तरी' या पुस्तकातून सुनीताबाई कशा दिसतात हे दाखवण्याचा फारसा प्रयत्न आतापर्यंत झालेला नाही. त्याची तात्त्विक समीक्षा करण्याचे प्रयत्न या जन्मशताब्दी वर्षात तरी अभ्यासक आणि विद्यार्थ्यांकडून व्हायला हवेत, अशी अपेक्षा बांदेकर यांनी व्यक्त केली. 'आहे मनोहर तरी' हे मराठीतील वेगळे आत्मचरित्र आहे. भाषाशैली, रचनाबंध, आशयसूत्र असे त्याचे सगळेच पैलू वेगळे आहेत. पुरुष समजून घेण्याकरिता स्त्रियांनी आणि खासकरून पुरुषांनी ते वाचण्याची गरज आहे. या अर्थाने या पुस्तकाचे महत्त्व आहे, असेही बांदेकर यांनी नमूद केले.
पु. ल.-सुनीताबाईंचे पुतणे जयंत देशपांडे आणि त्यांच्या पत्नी दीपा देशपांडे यांनी या दाम्पत्याच्या काही हृद्य आठवणी सांगितल्या. ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी प्रास्ताविक, तर दीप्ती कानविंदे यांनी निवेदन-सूत्रसंचालन केले. काव्यवाचन, अभिवाचन, त्याच्या स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन, सामाजिक संस्थेला पुरस्कार असे विविध कार्यक्रम यात राबवण्यात आले.
देशपांडे दाम्पत्याच्या दातृत्वाला सलाम करण्यासाठी 'सुनीताबाई-पु. ल.' सेवाव्रती पुरस्कार चिपळूणच्या 'सांजसोबत' या संस्थेला प्रदान करण्यात आला. माधुरी पुरंदरे, गिरीश कुलकर्णी, किरण यज्ञोपवीत, कौशल इनामदार, वैभव जोशी अशा नामवंत कलावंतांचे वैविध्यपूर्ण कार्यक्रमही यानिमित्ताने आयोजित करण्यात आले होते. राहुल कळंबटे यांनी काढलेली रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी