
पुणे, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। “कर्ज हे टाळण्याचं नव्हे, तर समजून घेऊन योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याचं साधन आहे,” असा संदेश देणारं ‘कर्जमुक्त व्हा!’ हे पुस्तक पुण्यात प्रकाशित झालं. फिरोदिया हॉल, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘मधुश्री पब्लिकेशन’तर्फे प्रकाशित आणि चार्टर्ड अकाउंटंट अभिजीत कोळपकर लिखित या पुस्तकात कर्जाच्या ओझ्यापासून मुक्त होण्यासाठीचे व्यावहारिक उपाय मांडले आहेत.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक आणि ‘सहकार भारती’चे संस्थापक सतीश मराठे तसेच चितळे उद्योगसमूहाचे श्रीकृष्ण चितळे उपस्थित होते.
आपल्या मनोगतात श्रीकृष्ण चितळे म्हणाले, “व्यवसाय करताना कर्ज घेणं अपरिहार्य असतं. मात्र कर्ज घेतलं की ते वेळेवर फेडणं तितकंच महत्त्वाचं आहे. बँका आता सहज कर्ज देतात, पण क्रेडिट कार्डच्या जाळ्यात अडकून कर्जबाजारी होऊ नये.तर सतीश मराठे म्हणाले, “आताची अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आहे आणि फिनटेकमुळे लघु उद्योजकांना वाजवी दरात कर्जसुविधा उपलब्ध होऊ शकतील. कर्ज घेणं आणि फेडणं या प्रक्रियेमुळे देशाचं आर्थिक चक्र गतिमान होतं. मात्र कर्ज वेळेत फेडणं हेच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु