
पुणे, 9 नोव्हेंबर (हिं.स.)संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिकी वारीसाठी आळंदी नगरपरिषदेकडून युद्धपातळीवर कामे मार्गी लावली जात असून, विविध ठिकाणची दुरुस्ती कामे अंतिम टप्यात अल्याचे चित्र आहे. कार्तिकीसाठी अतिक्रमण देखील हटविण्याचे काम शहरात वेगात असून, पालिकेकडून देहूफाटा भागातील अतिक्रमणे काढण्यात आली. याचबरोबर मरकळ रस्ता, महाद्वार चौक व वडगाव रस्ता भागात कारवाई करण्यात आली.पालिकेकडून आळंदी शहरातील मुख्य प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसरातील भराव रस्ता, महाव्दार रोड, चावडी रोड, चाकण रोड, नवीन पुल, जुना पुल, मंदिर परिसर व इतर परिसरात अतिक्रमण करून बसलेले पथारीवाले, हातगाडीवाले, खेळणीवाले, पेढेवाले आदींचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.अतिक्रमणाबरोबरच पालिकेने यात्रेच्या दृष्टीने अनुषंगिक कामे मार्गी लावली असून, शहरात महत्त्वाच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट बसविण्यात येणार आहेत. पाणी पुरवठ्यासाठी 24 तास जलशुद्धीकरण केंद्रातील पंप सुरू असणार असून, शहरात पालिकेचे व शासनाचे पाण्याचे टँकर उपलब्ध असणार आहेत. शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबत पालिका सज्ज असून, सरकारी व खासगी रुग्णालयांना बेड सज्ज ठेवण्यास व आरोग्य सुविधेबाबत सजग राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु