रत्नागिरी : पेढे येथे वाचनालय आपल्या दारी उपक्रम
रत्नागिरी, 9 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि पेढे ग्रामविकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ''वाचनालय आपल्या दारी'' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वाचन चळवळ वाढावी, समाजात वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून लोक
रत्नागिरी : पेढे येथे वाचनालय आपल्या दारी उपक्रम


रत्नागिरी, 9 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि पेढे ग्रामविकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 'वाचनालय आपल्या दारी' उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

वाचन चळवळ वाढावी, समाजात वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि पेढे ग्रामविकास मंडळाने पेढे कोष्टेवाडी येथील कामधेनू मंदिरात महिला वाचकांचा मेळावा घेतला. पेढे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुनील पडवेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लोकमान्य टिळक स्मारक ग्रंथालयाचे कोषाध्यक्ष सुबोध दीक्षित यांनी वाचनाची आवश्यकता आणि वाचनाचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. वाचनालयाचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांनी वाचनालय, कलादालन, वस्तुसंग्रहालय या वाचनालयाच्या उपक्रमांविषयी माहिती देऊन वाचनालयात भेट देण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

रामप्रसाद कान्हेरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. कान्हेरे यांनी वाचनालयामध्ये सातत्य दाखवणाऱ्या महिलांसाठी रोख बक्षीस जाहीर केले. मंडळाचे उपाध्यक्ष गजानन भोसले, सदस्य जनार्दन मालवणकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा माधुरी वारे यांनी मनोगत व्यक्त केले. वाचनालयातर्फे ५० पुस्तकांचा संच महिलांच्या स्वाधीन करण्यात आला. साखळी योजनेनुसार दरमहा नवीन पुस्तके देऊन पाहिली पुस्तके जमा करणे, असा उपक्रम यापुढे राबवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande