
सोलापूर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन मंगळवेढा सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांना देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देत असून त्यांच्या नेतृत्वामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. परंतु काही असामाजिक प्रवृत्तीकडून त्यांच्या जिवीतास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून समोर येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत संवेदनशील स्वरूपाचा असून जनतेमध्ये या विषयी तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे आपणास विनंती आहे की, या प्रकरणाची सखोल चौकशी व जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच, जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक असलेली शासकीय सुरक्षा तत्काळ पुरविण्यात यावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड