नागपूर विभागात २२ जणांची नायब तहसीलदारपदी बढती !
* निवडणूक आयोगाची मान्यता मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.) - नागपूर विभागातील महसूल सेवेतील २२ मंडल अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार (राजपत्रित, गट-ब) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. महसूल विभागाने याबाबतचा आदेश रविवारी काढला. विशेष म्हणज
नागपूर विभागात २२ जणांची नायब तहसीलदारपदी बढती !


* निवडणूक आयोगाची मान्यता

मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.) - नागपूर विभागातील महसूल सेवेतील २२ मंडल अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना नायब तहसीलदार (राजपत्रित, गट-ब) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. महसूल विभागाने याबाबतचा आदेश रविवारी काढला. विशेष म्हणजे, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर दिवसांपासून पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले आहे.

महसूल विभागात कर्मचाऱ्यांची कोणतीही कमतरता राहू नये आणि पात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पदोन्नती वेळेत मिळाव्यात, यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आग्रही भूमिका घेतली होती. त्यांनी या प्रलंबित पदोन्नत्या मार्गी लावण्यासाठी विशेष पुढाकार घेतला, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

या शासन आदेशानुसार, 'सहायक महसूल अधिकारी' आणि 'मंडळ अधिकारी' या संवर्गातील कर्मचाऱ्यांना सन २०२४-२५ या निवडसूची वर्षासाठी पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये १८ मंडळ अधिकाऱ्यांना नियमित पदोन्नती, तर एक सहायक महसूल अधिकारी आणि ०३ मंडळ अधिकारी अशा एकूण ४ जणांना तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या पदस्थापनेची ठिकाणेही यादीत जाहीर करण्यात आली आहेत.

शासनाने स्पष्ट केले आहे की, नवीन पदस्थापनेच्या पदावर ३० दिवसांच्या आत रुजू होणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे अधिकारी वेळेत रुजू होणार नाहीत, त्यांची पदोन्नती रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. हे आदेश तात्काळ अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले असून, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करून नवीन पदावर तात्काळ रुजू करून घ्यावे व तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे.

यापूर्वीही अप्पर जिल्हाधिकारी, जात पडताळणी समितीला अध्यक्ष आणि खात्यांतर्गत पदोन्नती हे विषय मार्गी लावलेले आहेत. आता मंडल अधिकाऱ्यांना पदोन्नतीने नायब तहसीलदार होता आले ही आमच्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. शासकीय कामे आता लवकर मार्गी लागतील अशी आशा आहे. - चंद्रशेखर बावनकुळे,

महसूल मंत्री

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande