
पुणे, 9 नोव्हेंबर (हिं.स.)पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) नागरी सुविधांसह उद्योगांसाठी पायाभूत सुविधांची आखणी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पुढील पाच वर्षांत २०८ प्रकल्प हाती घेण्यात येणार असून, ३३ हजार ७०० कोटी रुपयांच्या निधीतून विविध पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून यातील ९०० कोटी रुपयांची कामे सुरू होणार आहेत,’ अशी माहिती ‘पीएमआरडीए‘’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा ‘पीएमआरडीए’च्या वतीने घेण्यात आली. या वेळी आयुक्त डॉ. म्हसे म्हणाले, ‘उद्योग आणि व्यवसायांच्या वाढीसाठी औद्योगिक संघटना आणि उद्योजकांच्या अडचणींचे निराकरण करणे महत्त्वाचे आहे. त्या अडचणी सकारात्मक दृष्टिकोनातून कशा सोडवता येतील, यासाठी तालुका कार्यालय स्तरावर ‘पीएमआरडीए’ तातडीने पावले उचलत आहे. उद्योजकांचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी सहायक नगररचनाकार आणि सहायक संचालक यांचा पूर्ण वेळ स्वतंत्र कक्ष सुरू करून उद्योजकांचे प्रश्न निकाली काढण्यात येणार आहेत. यासह तालुका कार्यालयातील अधिकाऱ्यांचे अधिकार वाढवून बांधकाम परवानगी, अग्निशामक ना हरकत प्रमाणपत्रांसह इतर कामकाजात सुसूत्रता आणण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु