
पुणे, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। कर्करोगाचा शरीरात किती व कोठे प्रसार झाला आहे. याची तपासणी करण्यासाठी असलेली ससून रुग्णालयातील ‘पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी’ (पेट स्कॅन) तपासणी आता पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे. ती गेल्या काही दिवसांपासून बंद होती. बाहेर खासगी रुग्णालयात किंवा स्वतंत्र ‘पेट स्कॅन’ केंद्रात ही तपासणी करण्यासाठी १५ ते २५ हजार रुपये खर्च येतो. परंतु, तीच तपासणी येथे अवघ्या पाच हजारांत होत असल्याने कर्करोग निदानासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून तपासणी करणारे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने रुग्णालयातील ‘पेट स्कॅन’ मशिन बंद होती. त्यामुळे तपासणीसाठी रुग्णांना खासगी निदान केंद्रांकडे जावे लागत होते. खासगीमधील खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता. दरम्यान, ससून रुग्णालयातील पेट स्कॅन मशिनसाठी तांत्रिक तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली असून, आवश्यक प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर तपासणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दररोज सरासरी ४ ते ५ ते जणांची तपासणी होते. शुक्रवारपासून रुग्णांची तपासणीदेखील सुरू झाली असून, ज्या आर्थिक दुर्बल घटकांना ही तपासणी परवडत नाही त्या रुग्णांच्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यमापन करून त्यांची तपासणी मोफत केली जाते, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु