
सातारा, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। सातारा शहर परिसरात स्वर्गीय जेष्ठ धन्वंतरी व हृदयरोग तज्ञ डॉ. रवींद्र हर्षे, डॉ.बाबा साठे, डॉ.अशोक गोंधळेकर तसेच साहित्य क्षेत्रातील स्वर्गीय अरुणकाका गोडबोले यांच्यासारखी हिरे ,माणके आणि रत्नेच सर्वांनी अनुभवली .आरोग्यसेवेत या लोकांनी अतिशय चांगली सेवा देतानाच जे ऋणानुबंध जपले ,ते सातारकर आजही त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवून पुढे वाटचाल करत आहेत. या पिढीनंतरही सातारा शहराची जोडलेली नाळ या कुटुंबीयांच्या नव्या पिढीने अशीच कायम ठेवावी व सातारचे सौंदर्य आणि परंपरा अशीच कायम ठेवून वृद्धिंगत करावी ,अशा अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.
सातारा येथील दि आयुर्वेदीय अर्कशाळा संस्थेच्या सदरबाजार परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या उत्पादन विक्री केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते .या कार्यक्रमासाठी आयुर्वेदीय अर्कशाळेचे चेअरमन डॉ .धनंजय बोधे ,संचालक व माजी नगराध्यक्ष डॉ.अच्युत गोडबोले, हर्षे परिवारातील श्रीमती शोभा हर्षे .अनिकेत हर्षे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयुर्वेदिय अर्कशाळेच्या वतीने हे विक्री केंद्र डॉ. रवींद्र हर्षे यांच्या निवासस्थानामध्ये हर्षे परिवाराच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहे .त्याचे उद्घाटन फीत कापून तसेच धन्वंतरी देवता पूजन करून मान्यवरांनी केल्यावर आपल्या प्रास्ताविक भाषणात संचालक डॉ.अच्युत गोडबोले यांनी संस्थेच्या शंभर वर्षाच्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या कार्याची माहिती उपस्थितांना करून दिली.घरगुती स्वरूपात वैद्य आगाशे यांनी ही दर्जेदार उत्पादने बनवत आज 100 वर्षाची वाटचाल संस्थेच्या अनेक ख्यातकीर्त धन्वंतरीनी आपली सेवा देत वृद्धिंगत केली .संपूर्ण महाराष्ट्रासह तेलंगणा ,कर्नाटक राज्यातही या संस्थेच्या शाखांचा विस्तार झालेला आहे. आज शंभरहून अधिक कुटुंबांची जबाबदारी ही संस्था कर्मचारी व कामगार स्वरूपामध्ये सांभाळत असताना सातारा शहरात पोवई नाका ,सदर बाजार परिसरातील नागरिकांसाठी उत्पादने सहज सुलभतेने उपलब्ध व्हावी या हेतूने डॉ. रवींद्र हर्षे यांच्या परिवाराशी चर्चा करून हे विक्री सेवा केंद्र सुरू करण्यात आले. त्याचा लाभ संपूर्ण जिल्हावासियांनी घ्यावा असे आवाहन यावेळी डॉ.गोडबोले यांनी केले.
संस्थेचे चेअरमन डॉ.धनंजय बोधे यांनी अर्कशाळेचा या कार्यविस्तारासाठी हर्षे परिवाराने अतिशय नाममात्र किमतीत जागा उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थाने स्वर्गीय डॉ. हर्षे यांच्या कार्याची ओळख चिरंतन ठेवली असल्याचे सांगितले.
मार्गदर्शन करताना श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की ,आमच्या राजघराणे यांचे अतिशय जवळचे ऋणानुबंध असलेले डॉ, रवींद्र हर्षे हे खऱ्या अर्थाने धन्वंतरी होते .भाऊसाहेब महाराज,मातोश्री आईसाहेब महाराज यांची नितांत श्रद्धा त्यांचे वर होती.अगदी राजमाता श्री.छ.सुमित्राराजे भोसले यांचेपासून हर्षे परिवाराशी आमची जवळची एक घट्ट ऋणानुबंधाची ठेव खऱ्या अर्थाने जपली गेली होती. कै.डॉ.रविंद्र हर्षे यांच्या जयंती दिवशी असंख्य ग्राहकांच्या आग्रहाखातर अर्कशाळेने हे विक्री केंद्र सुरू करून खऱ्या अर्थाने नव्या वाटचालीला प्रारंभ केला आहे. मार्केटिंगच्या युगामध्ये आपली दर्जेदार उत्पादने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्थेने आपला अधिक कार्यविस्तार तसेच जाहिरातीचे माध्यम स्वीकारून ही उत्पादने संपूर्ण देशात पोचवावी हीच अपेक्षा मी यावेळी करून संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा देतो असे सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर