
परभणी, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी शहरातील मातोश्री नगर येथे प्रभाग क्रमांक १५ च्या वतीने आयोजित नागरी संवाद मेळावा आणि विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा ज्येष्ठ नेते मा. आ. श्री. रामप्रसादजी बोर्डीकर, मा. आ. श्री. सुरेशराव वरपूडकर, भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीराव भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश भुमरे आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्यासह प्रभागातील नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
या प्रसंगी २५ लाख रुपयांच्या निधीतून नाली बांधकामासह प्रभागातील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि जीवनमान उंचावण्यासाठी ही कामे उपयुक्त ठरणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
नागरी संवाद मेळाव्यात नागरिकांनी आपल्या समस्या, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. त्यावर लोकप्रतिनिधींनी सकारात्मक चर्चा करत तात्काळ तसेच दीर्घकालीन उपाययोजनांची ग्वाही दिली. “प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील,” असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis