
डोंबिवली, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।
काही महिन्यांवर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची निवडणूक येऊन ठेपली असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू जयेश म्हात्रे आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच शहरातील माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांनी हाती भाजपाचा झेंडा घेतला. या सर्वांना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपची शाल देऊन सर्वांचे स्वागत केले.
यावेळी दिपेश म्हात्रे यांनी हा विकास आणि लोकहितासाठी निर्णय घेतल्याचे सांगितले. या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू होती. अखेर आज मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कार्यांनी प्रभावित होऊन रविंद्र चव्हाण आणि कपिल पाटील यांच्या नेतृत्वात आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. लोकविकासाची काम करण्याचे आमचा हेतू आहे. आता पुढच्या काळात आम्ही ते करणार आहोत.
त्यांनी पुढे सांगितले मी उद्धव ठाकरे किंवा कोणावर टीका करणार नाही. त्यांनी मला नेहमी पक्षांचं काम करण्याची संधी दिली आहे. गेली १३ वर्ष मी शिवसेनेत काम केलं आहे. मी त्यांचे आभार मानतो. विकासाची कामे करायची असतील तर सत्तेच्या आणि निर्णय घेण्याच्या केबलवर नसलो, तर लोकांची कामं करता येत नाही. गेली तीन वर्ष कुठलाही निधी नाही. सर्वसामान्य लोकांची कामं करण्यास त्रास होत होता. तसेच इतर पक्षांकडून गळचेपी होण्याचं काम देखील सुरू होतं. भाजपमध्ये लोकांसाठी काम करता येईल असा विश्वास दिपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला.
तसेच ठाकरे गटात वरिष्ठ नेत्यांचा काही दोष नाही. खालचं नेतृत्व, त्यांची काम करण्याची पद्धत, जुने आणि नवीन यांच्यातला फरक करण्याची पद्धत याला सर्वच कंटाळतात. त्यामुळे मी त्या पक्षात न राहण्याचा निर्णय घेतला. आम्हाला या ठिकाणी जनतेला न्याय देता येईल
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष केणे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने एकाच वेळी ठाकरे गट, शिंदे गट (अप्रत्यक्ष) आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांना मोठा हादरा दिला आहे. हा परिसर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे भाजपच्या या खेळीने महायुतीतील शिंदे गटालाही एक अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi